राजकारणातला "पुष्पगुच्छ" - Faltupana.in

Faltupana.in

Funny images, Jokes, Article, Marathi Graffiti. आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ..

Loading...

वाचकांची पसंद :

Post Top Ad

Post Top Ad

राजकारणातला "पुष्पगुच्छ"

राजकारणातला पुष्पगुच्छ 

समाजकारण आणि राजकारण यात समाजाचे भले करायचे म्हणून सत्ता वापर करण्यासाठी राजकारणात आलेल्या एखद्या नवीन उत्साही कार्यकर्त्याला पहिला स्वागताचा "पुष्पगुच्छ" मिळतो. त्याला काय माहित कि "नाम" मधील परेश रावल त्याचा संजय दत्त करून आता "One Way" मध्ये आला असे सुचवतो आहे. 

मग हळू हळू एक श्रद्धास्थान, प्रेरणास्थान सुद्धा तयार होते आणि विचारधारा नामक एक "जाळे" पण स्वतःभोवती गुंफायला सुरुवात होते. कधी तो आपले "स्थान" विसरून जाळ्यात गुरफटून जातो त्याचे त्याला कळत नाही. 

आता पहिली परीक्षा असते "होर्डिंग" लावण्याची, तिथे जो जास्त मोठे लावेल तो जास्त कार्यकुशल आणि प्रामाणिक. ती परीक्षा पार करायची म्हणजे घरातील तेलाने रस्त्यावर "दिवा" लावणे अजून काही नाही. एकदा का होर्डिंग आणि झेंडे लावून शहराचे सुशोभीकरण केले कि हक्काचा पुष्पगुच्छ वाट पाहत असतोच. कारण आता तो लाडका झाला असतो, अगदी घरातला.  

मग आता बैठकीतला असल्याने "पद्प्राप्ती" होते आणि अजून एक "पुष्पगुच्छ" मिळतो. थोडा मोठा आणि अजून गुलाब असलेला आणि काटे लपविलेला. कारण एव्हाना "समाजकारण" करायचे धाडस करण्याची इच्छा जवळपास संपतच आलेली असते. आता "पद" आणि "प्रतिष्ठा" असा खेळ सुरु झालेला असतो आणि त्यासाठी "नियम" कुठलेच नसतात. 

पुढची पायरी मात्र काटेरी रस्त्यावर असते कारण निवडणुका दारावर आलेल्या असतात. एकतर तुम्ही आपली यात्रा काढायची असते आणि ते नाही जमले तर मग दुसरा तुमची काढतो. जर तिकीटाची किंमत मोजून ते मिळाले तर अजून एक पुष्पगुच्छ मिळतो. त्याच्यावर "Price Tag" असतो आणि लिहिले असते "भावी" !
 
 

 
आता निवडणुकीची लढाई म्हणजे "पूर" आला पाहिजे आणि तो समाजकार्याच्या घामाचा अथवा विचारधारेच्या झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा नसून "पैसा आणि दारूचा" असतो ! त्या पुरात एकतर "Surfing" जमली तर "नामदार" आणि नाही तर बुडून मेले कि "कर्जदार" ! निकाल काहीही असो एक पुष्पगुच्छ ठरलेला असतोच. एकात सत्तेचा सुगंध असतो आणि दुसऱ्यात निवृत्तीचा संदेश. 

प्रवास असाच सुरु असतो. राजकारणाची धुंदी पैसा , सत्ता , जातपात आणि स्वार्थ यामुळे अजूनच गडद होत जाते. इतकी कि वाकणारा कायदा पण कडाकडा मोडू लागतो. समाजकारणाची दोरी आता कुठे तरी मागेच सुटली असते कारण संवेदनाची तिला पकडणारी गाठ सुटलेली असते. 

आता सत्तापद असते त्यामुळे पूर्वी कार्यकर्ता ते नेता प्रवासात चुकविलेली सगळी किंमत सव्याज वसूल करायची असते. तिथे "लज्जा" बाळगायची नसते आणि हवे ते ओरबाडून घायचे असते अर्थात बदल्यात "पुष्पगुच्छ" देवूनच !

आता प्रवास संपणार असतो पण तो आपल्या इच्छेने नसून शेवटी ती  देवाज्ञा असते. शरीर निष्प्राण पडलेले असते. अंतरआत्मा पूर्वीच गेला होता आता जीवात्मा पण निघून जातो. राहतो तो फक्त एक "पुष्पगुच्छ" ज्याच्यात न कुठला सुगंध असतो न कुठले तेज !

(काल्पनिक…)  

नितीन शुक्ल 
     

                                 

Post Top Ad

Loading...