थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पहिला गणपती- मोरगावचा 'श्री मोरेश्वर'


अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पहिला गणपती- मोरगावचा 'श्री मोरेश्वर' (ता.बारामती जि.पुणे)


अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कर्‍हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे.

आख्यायिका (इतिहास):-

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.

या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

-पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.