थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन - आठवा गणपती- श्री बल्लाळेश्वर (श्रीक्षेत्र पाली,रायगड)


अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन -  आठवा गणपती- श्री बल्लाळेश्वर (श्रीक्षेत्र पाली,रायगड)

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

-आख्यायिका-

विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो